Wednesday, January 14, 2015

स्वयंवर झालें सीतेचे

आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें
स्वयंवर झालें सीतेचे

श्रीरामांनी सहज उचलिलें धनू शंकराचें
पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतु अंतरींचे
उभे ठाकलें भाग्य सांवळें समोर दुहितेचें

मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजी एकवटुनिया निजशक्‍ति सारी
फुलुं लागलें फूल हळुं हळू गालीं लज्जेचें

उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई
श्रीरामांनीं केले तुकडे दोन धनुष्याचे

अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
मुक्‍त हासतां, भूमीकन्या मनोमनीं लाजे
तृप्‍त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे

हात जोडुनी म्हणे नृपति तो विश्वामित्रासी
"आज जानकी अर्पियली मी दशरथ-पुत्रासी"
आनंदाने मिटले डोळे तृप्‍त मैथिलीचे

पित्राज्ञानें उठे हळुं ती मंत्रमुग्ध बाला
अधिर चाल ती, अधिर तीहुनी हातींची माला
गौरवर्ण ते चरण गांठती मंदिर सौख्याचें

नीलाकाशीं जशी भरावी उषःप्रभा लाल
तसेंच भरले रामांगी मधु नूपुरस्वरताल
सभामंडपी मीलन झालें माया-ब्रम्हाचे

झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
गगनामाजीं देव करांनी करिती करताला
त्यांच्या कानीं गजर पोंचले मंगल वाद्यांचे

अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता
गंधर्वांचे सूर लागले जयगीता गातां
आकाशाशीं जडलें नातें ऐसे धरणीचें

My favorite song

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवेहिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे

रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली ?
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे

बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते
नदिच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे

या ओठांनी चुंबुन घेइन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे !!